महापुराच्या पाण्यात अन्नधान्य, संसारोपयोगी साहित्य गेले वाहून मदतीची गरज !

परंडा(तानाजी घोडके ) परंडा शहरासह तालुक्याला परतीच्या मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने सीना नदी, चांदणी, उल्फा, उल्का, दुधना नद्यांना महापूर आल्याने परंड्याहून बार्शी, भूम, कुर्डुवाडी, करमाळा जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तर ग्रामीण भागातील अनेक गावात नद्यांचे पाणी घुसल्याने ग्रामीण भागाचा देखील तालुक्याशी संपर्क तुटला आहे. महापुरात अडकलेल्या ग्रामस्थांच्या घरातील अन्नधान्य संसारोपयोगी साहित्य पाण्यात वाहून गेल्याने या ग्रामस्थांची खाण्याची पंचायत झाली असून त्यांना मदतीची गरज आहे.

तालुक्यातील अनेक गावांना महापुराचा फटका बसला असून नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. परंड्याहून बार्शी, भूम, कुर्डुवाडी, करमाळा तालुक्याकडे जाणारे सर्व रस्ते पुलावर मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने सर्व वाहतूक बंद झाली NCRF आहे. तर तालुक्याच्या ग्रामीण भागातून येणारे सर्व रस्ते देखील पुलावर व ओढ्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद असल्याने मागील दोन दिवसांपासून ग्रामीण भागातील ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी येता आले नाही. परंडा तालुक्यात आलेला हा महापूर असे या अधी कधीच पाहिला नाही, देवगाव खुर्द येथील ७५ वर्षीय तात्या चौधरी यांनी सांगितले.

परंडा तालुक्यातील सीना नदी, उल्का, उल्फा, चांदणी, खैरी, दुधना अशा अनेक लहान मोठ्या नद्यांना रविवारी रात्रभर तुफान पाऊस झाल्याने महापूर आल्याने देऊळगाव, तांदुळवाडी, शेळगाव, आलेश्वर, देवगाव, लाखी, खासापुरी, ढगपिंपरी, नालगाव, सोनगिरी येथील कुंभार वस्ती, देवगाव खुर्द, वडनेर, आवारपिंपरी, वागेगव्हाण परिसरातील वाडी वस्तीवर राहणारे शेकडो शेतकरी महापुराच्या पाण्यात अडकले होते. या ग्रामस्थांना प्रशासनाने हेलिकॉप्टर, सैन्यदल, आपत्ती व्यवस्थापन पथकांना प्रचारण करून त्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. महापुराच्या पाण्यात अडकलेल्या ग्रामस्थांनी घरात ठेवलेले ज्वारी, गहू, बाजरी, मीठ, मिरची तांदूळ, डाळ, आणि संसारोपयोगी साहित्य पाण्यात वाहून गेल्याने शासनाने मदत नुकसानग्रस्तांना तत्काळ द्यावी, अशी मागणी होत आहे.

error: Content is protected !!