धाराशिव दि.३(प्रतिनिधी) धाराशिव येथील नियोजन भवनातील सभागृहात जिल्हास्तरीय सनियंत्रण व समन्वयक दिशा समितीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीस आमदार श्री. कैलास पाटील, आमदार श्री. प्रविण स्वामी, जिल्हाधिकारी श्री. कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मैनांक घोष तसेच दिशासमिती सदस्य सौ. शामलताई वडने व सौ. कांचन ताई संगवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीदरम्यान संबंधित विभागांनी सद्यस्थितीबाबत सादरीकरण केले. नागरिकांना थेट लाभ मिळावा यासाठी योजनांची काटेकोर अंमलबजावणी, वेळेवर निधी वितरण व लोकाभिमुख कार्यप्रणाली यावर विशेष भर देण्यात आला.
यावेळी जनहिताच्या दृष्टीने काही ठोस सूचना व मार्गदर्शन करण्यात आले –
• उमरगा-सोलापूर रस्त्याची अपूर्ण कामे पूर्ण करावीत.
• औसा–उमरगा रोडवरील अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात.
• केज–कळंब–कुसळंब रस्त्याचे निकृष्ट काम झाल्याने संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित करावी.
• अणदूर ब्रिज १५ सप्टेंबरपर्यंत दुतर्फा वाहतुकीसाठी खुला करावा.
• अष्टमोड पुलाचे काम पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करावा.
• येरमाळा घाट व मांजरा नदीवरील पुलाचे काम तातडीने सुरू करावे.
• तुळजापूरमध्ये नवरात्र महोत्सव लक्षात घेऊन सर्विस रोडची अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करावीत.
• येडशी ते जवळा दु रोडचे काम ऑक्टोबरअखेर पूर्ण करावे.
• बोळेगाव–अलूर रस्त्याचे १३०० मीटर प्रलंबित काम त्वरित पूर्ण करावे.
• नळदुर्ग–अक्कलकोट मार्गाच्या मोजणी व संपादन प्रक्रिया १५ दिवसांत पूर्ण करून अहवाल सादर करावा.
• धाराशिव–तुळजापूर रेल्वेमार्गाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करावे. तुळजापूर–सोलापूर रेल्वेमार्गासाठी राज्य शासनाने सुधारित अंदाजपत्रकानुसार आपला हिस्सा उपलब्ध करून द्यावा.
• प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील ३२ पैकी अपूर्ण असलेली १७ कामे वेळेत पूर्ण करावीत. काम वेळेत न करणाऱ्या ठेकेदारावर कार्यवाही करावी.
• घरकुल योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना पहिला हप्ता एका आठवड्यात वितरित करावा.
• शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी प्रभागनिहाय जबाबदारी निश्चित करावी.
• अटल अमृत योजनेअंतर्गत नगरपरिषद क्षेत्रातील पाणीपुरवठा कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करावीत.
• रबी हंगामातील वाढत्या वीज मागणीसाठी मुख्यमंत्री सौर कृषी वहिनी योजनेअंतर्गत सबस्टेशनची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत.
• एमआरजीएस अंतर्गत वैयक्तिक लाभाची निधी मागणी करावी तसेच सार्वजनिक शेतरस्त्यांची कामे पावसाळ्यानंतर सुरू करावीत.
• NHM अंतर्गत झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची तपासणी COEP मार्फत करावी.
• पूर्ण झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामधून तातडीने आरोग्य सेवा सुरू करावी.
या बैठकीस जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख, प्रकल्प अधिकारी व मान्यवर उपस्थित होते