धाराशिव, दि. 23 मार्च 2026 — शेतात जाण्यासाठी आवश्यक रस्ता मिळावा या मागणीसाठी स्थानिक दिव्यांग शेतकरी नारायण हनुमंत साखरे यांनी प्रशासनाला इशारा दिला असून, मागणीची दखल न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेल्या निवेदनात साखरे यांनी नमूद केले आहे की, त्यांनी 1 डिसेंबर 2025 रोजी तहसील कार्यालय, धाराशिव येथे शेतरस्त्यासाठी अर्ज केला होता. मात्र, तब्बल चार महिने उलटूनही संबंधित यंत्रणेकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
रस्ता नसल्यामुळे शेतात ये-जा करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आपण ‘मूकबधिर’ दिव्यांग असल्यामुळे आपल्या अर्जाकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास 6 एप्रिल 2026 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, या निवेदनावर कुटुंबातील अनेक सदस्यांच्या सह्या असून त्यामध्ये नारायण हनुमंत साखरे (मूकबधिर), सुनिता नारायण साखरे (मूकबधिर), स्वराज नारायण साखरे (मूकबधिर), गोपाळ नारायण साखरे (मूकबधिर), हनुमंत शंकर साखरे (वडील), मोहन हनुमंत साखरे (भाऊ) व छाया हनुमंत साखरे (आई) यांचा समावेश आहे.
या प्रकरणात प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून संबंधित शेतकऱ्याला न्याय द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.