धाराशिव, दि. १(माझं गांव माझं शहर) : जिल्ह्यात २१ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत कोणताही बाधित शेतकरी किंवा नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही, याची संपूर्ण दक्षता घेतली जाईल. नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून पारदर्शक पद्धतीने मदतकार्य राबवले जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या महापुरामुळे जिल्ह्यात मोठी हानी झाली असून आतापर्यंत ८ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, तसेच अनेक पाळीव जनावरांचाही बळी गेला आहे. शेती आणि सार्वजनिक मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील उपस्थित होते.
पंचनामे ५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करणार
जिल्हाधिकारी पुजार यांनी सांगितले की, नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून ते ५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुराच्या पाण्याने बाधित झालेल्या ३,१४९ कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रुपयांची तातडीची मदत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नुकसानीची अचूक माहिती मिळवण्यासाठी तुळजापूर येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेकडून (TISS) सर्वेक्षण केले जात असून, त्यांचा अहवाल मिळाल्यानंतर नुकसानीचा नेमका आकडा स्पष्ट होईल. तसेच, जुलै-ऑगस्ट २०२५ मधील पीक नुकसानीपोटी शासनाकडून प्राप्त झालेले १८९ कोटी रुपये देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत.
आरोग्य आणि पुनर्वसन उपाययोजना
पूर ओसरल्यानंतर रोगराई पसरू नये यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी सांगितले. बाधित गावांमध्ये आरोग्य पथकांद्वारे दैनंदिन तपासणी केली जात असून, दूषित झालेले पाण्याचे स्रोत निर्जंतुक करण्याचे काम सुरू आहे. २ ऑक्टोबर रोजी प्रत्येक गावात ग्रामसभेतून विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे.
भविष्यकालीन नियोजन आणि आवाहन
भविष्यात अशा आपत्कालीन परिस्थितीत कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी उपाययोजना केल्या जातील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दळणवळण ठप्प होण्यास कारणीभूत ठरलेल्या लहान पुलांची उंची वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर केला जाईल. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कंपन्या आणि बँकांच्या सीएसआर निधीतून मदत मिळवण्यासाठी लवकरच ‘सीएसआर कॉन्फरन्स’ आयोजित केली जाईल व कंपन्यांना गावे दत्तक घेण्याचे आवाहन करण्यात येईल.
या कठीण काळात शेतकऱ्यांनी निराश न होता आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नये, शासन व प्रशासन आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे, असा विश्वास जिल्हाधिकारी पुजार यांनी व्यक्त केला. तसेच, सेवाभावी संस्थांनी मदतकार्य करताना थेट गावात न जाता तालुका प्रशासनाशी समन्वय साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.