परंडा-कारंजा येथील पूरपरिस्थितीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी; बोटीतून केला पाहणी दौरा.

परंडा(तानाजी घोडके ) परंडा तालुक्यातील कारंजा आणि आसपासच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर पूरपरिस्थितीची पाहणी आज दि.२४ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) बोटीमधून प्रवास करत त्यांनी पूरग्रस्त भागाचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री प्रताप सरनाईक, परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार डॉ. तानाजीराव सावंत आणि जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार हे देखील उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे परिसरातील अनेक गावांमध्ये पाणी शिरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाकडून सुरू असलेल्या बचाव आणि मदतकार्याची माहिती घेण्यासाठी व नुकसानीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि इतर मान्यवर आज कारंजा येथे दाखल झाले.

एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीने बोटीतून प्रवास करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पाण्याखाली गेलेल्या घरांची आणि शेतजमिनीची पाहणी केली. त्यांनी पूरग्रस्तांना धीर देत, शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच, तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत पोहोचवण्याचे निर्देश त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले.

आमदार डॉ. तानाजी सावंत यांनी उपमुख्यमंत्र्यांना स्थानिक परिस्थितीची आणि झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती दिली. या पाहणी दौऱ्यामुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळाला असून, प्रशासकीय यंत्रणांनाही मदतकार्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.

error: Content is protected !!