📰 माझं गाव माझं शहर | परंडा (प्रतिनिधी) : शहरातील एका पत्रकारास दमदाटी करून जातिवाचक शिवीगाळ केल्याच्या गंभीर प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी जनशक्ती नगर विकास आघाडीच्या १३ नगरसेवकांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी धाराशिव, मुख्याधिकारी नगर परिषद परंडा तसेच नगराध्यक्ष यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.
घनकचरा व्यवस्थापनातील बिघडलेल्या परिस्थितीमुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून घंटागाडी मुजावर गल्ली परिसरात न आल्याने स्थानिकांमध्ये नाराजी होती. याच पार्श्वभूमीवर शहरातील पत्रकार निसार मुजावर यांनी नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक श्री. जगदीश सोंडगे यांना दूरध्वनीवरून विचारणा केली. यावेळी सोंडगे यांनी शिवीगाळ करत जातिवाचक वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेमुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, शहरात जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर गटनेते अनिल शिंदे, उपनगराध्यक्ष समरजीत सुजितसिंह ठाकूर, रत्नमाला राहुल बनसोडे, अविनाश कुमार विधाते, रुकसाना रहेमतुल्ला पठाण, मदनसिंह सुभाषसिंह सद्दीवाल, परवीन मन्नान बासले, मदिनाबी खाजा पठाण, वैशाली सोमनाथ अलबत्ते, रुखियाबी जकेरिया दहेलुस, अब्बास उमर मुजावर, रमेशसिंह परदेशी व इस्माईल कुरेशी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
