परंडा (प्रतिनिधी): तालुक्यात भारत पेट्रोलियमच्या घरगुती गॅस (LPG) एजन्सीमार्फत राबवल्या जाणाऱ्या सुरक्षितता तपासणी (Safety Survey) मोहिमेत ग्राहकांची आर्थिक लूट होत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. सर्व्हेच्या अधिकृत पावतीवर असलेल्या मूळ रक्कमेवर खाडाखोड करून ग्राहकांकडून जादा पैसे उकळले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, गॅस एजन्सीमार्फत घरोघरी जाऊन गॅस जोडणीची तपासणी केली जात आहे. नियमानुसार या तपासणीचे ठराविक शुल्क कंपनीने निश्चित केले आहे. मात्र, परंडा येथील एजन्सीचे कर्मचारी ग्राहकांना देत असलेल्या पावतीवर मूळ किंमत खोडून त्या जागी हाताने जास्त रक्कम लिहित असल्याचे दिसून आले आहे. अनेक सुज्ञ ग्राहकांनी यावर आक्षेप घेतला असता, कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.
ग्राहकांमध्ये संताप !
“गॅस एजन्सीने आधीच गॅस सिलिंडरचे दर वाढलेले असताना, आता सर्व्हेच्या नावाखाली ही नवी लूट सुरू केली आहे. पावतीवर खाडाखोड करणे हा कायदेशीर गुन्हा असून, अधिकृत रक्कमेपेक्षा ५० ते १०० रुपये जास्त घेतले जात आहेत,” अशी तक्रार एका त्रस्त ग्राहकाने केली आहे.
प्रशासनाकडून कारवाईची मागणी ?
या प्रकारामुळे ग्रामीण भागातील अशिक्षित आणि गरीब ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. भारत पेट्रोलियमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक तहसील प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित एजन्सीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी परांडा शहरातील व तालुक्यातून नागरिकांकडून होत आहे.
काय काळजी घ्यावी?
गॅस सर्व्हेच्या पावतीवर कंपनीची छापील किंमत तपासा. जर पावतीवर खाडाखोड असेल तर पैसे देण्यास नकार द्या.
अशा प्रकारची फसवणूक होत असल्यास भारत गॅसच्या अधिकृत तक्रार निवारण पोर्टलवर किंवा ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवा.