सुयश विद्यालया विरुद्ध फिर्याद ; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन

बार्शी( प्रतिनिधी) : दि. 23 सप्टेंबर 2025 रोजी मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सोलापूर यांनी काढलेल्या आदेशान्वये अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळांना सुट्टी घोषित करण्यात आली होती. मात्र या आदेशाचे उल्लंघन करत बार्शी येथील सुयश विद्यालय हे शाळा सुरु ठेवण्यात आल्याचे उघड झाले आहे.

याबाबत प्रभारी गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती बार्शी बालाजी देवराव नाटके यांनी दि. 24 सप्टेंबर 2025 रोजी बार्शी शहर पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दाखल केली आहे. नाटके यांनी दिलेल्या फिर्यादी जबाबानुसार, दुपारी 4.30 वाजता मा. तहसीलदार बार्शी यांनी त्यांना फोनद्वारे सुयश विद्यालय सुरु असल्याची माहिती दिली.

      त्यानंतर नाटके व विस्तार अधिकारी भारत बावकर यांनी शाळेची पाहणी केली. दुपारी 4.45 च्या सुमारास शाळेबाहेर विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस निघताना दिसली. शाळेत प्रवेश केल्यावर वर्ग उघडे असल्याचे व शिक्षक/कर्मचारी घरी जाण्याच्या तयारीत असल्याचे निदर्शनास आले.
      सदर प्रकाराविषयी तात्काळ तहसीलदारांना माहिती दिल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. सुयश विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले असून त्यांच्याविरुद्ध BNS कलम 223 अंतर्गत सरकार तर्फे कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे बार्शी तालुक्यात शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

error: Content is protected !!