‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी!

मुंबई(प्रतिनिधी) बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत स्वराज्य भूमी (गिरगाव चौपाटी)वर आयोजित विसर्जन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी करून गणरायांना निरोप दिला. महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला दिलेल्या राज्य महोत्सवाच्या दर्ज्यानुसार, या वर्षीचा उत्सव मुंबईत अभूतपूर्व जल्लोषात पार पडला. ढोल-ताशांच्या गजरात, ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात चौपाटीवरील वातावरण भारावून गेले होते.

याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील दहा दिवसांचा गणेशोत्सव उत्साहात व शांततेत साजरा झाला. लोकांनी मोठ्या जल्लोषात उत्सव साजरा केला. विसर्जनावेळी मनात थोडी खंत आणि दु:ख असते, पण त्याचवेळी बाप्पा पुढील वर्षी पुन्हा येणार या आनंदाने प्रत्येकाचे मन भरून जाते.

मुंबई, पुणे आणि राज्यातील सर्व शहरांमध्ये तसेच गावांमध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुका शिस्तीत व शांततेत पार पडल्या. या यशस्वी व्यवस्थेबद्दल मुख्यमंत्री म्हणाले की, पोलीस विभाग, महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासन यांनी केलेली तयारी अत्यंत कौतुकास्पद आहे.

गिरगाव चौपाटीवरील विसर्जन सोहळ्याला विविध मान्यवरांची उपस्थिती होती. मुंबई महानगरपालिका, पोलीस आणि स्वयंसेवकांनी एकत्रितपणे केलेल्या व्यवस्थेमुळे हा सोहळा सुरक्षित आणि सुरळीत सुरू आहे.

यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार अमीत साटम व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!