परंडा दि. १ नोव्हेंबर(प्रतिनिधी) परंडा गटशिक्षण कार्यालयात गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या कथित ‘काळा बाजार आणि नियमबाह्य कारभारावर अखेर प्रकाशझोत पडला आहे. प्रभारी गटशिक्षणाधिकारी एस.बी. हाके यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला असून, त्यांनी ‘सेवा प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण न करता शासनाची दिशाभूल करून बेकायदेशीरपणे वेतनवाढीचा आर्थिक लाभ घेतल्याचा हा प्रकार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, सामाजिक न्याय विभागाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक राहुल बनसोडे यांनी हा गंभीर प्रकार उघडकीस आणला आहे. त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. बनसोडे यांनी हाके यांना तात्काळ बडतर्फ करून, नियमबाह्य पद्धतीने घेतलेल्या वेतनवाढीची संपूर्ण रक्कम वसूल करण्याची मागणी केली आहे..
नेमका आरोप काय?
राहुल बनसोडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत स्पष्ट केले आहे की, एस.बी. हाके यांची २०११ मध्ये शिक्षण विस्तार अधिकारी पदावर सरळ सेवेने नेमणूक झाली होती. नियमानुसार, त्यांना सेवा प्रवेशोत्तर परीक्षा पास होणे बंधनकारक होते. मात्र, हाके यांनी २०१९ पर्यंत ही परीक्षा दिली नाही. असे असूनही, त्यांनी प्रशासनाची फसवणूक करून नोकरीत कायम राहण्याचा आणि बेकायदेशीरपणे वेतनवाढीचा लाभ घेण्याचा मार्ग पत्करला, असा आरोप आहे. यासंदर्भात, शासनाने १ मार्च २०१८ रोजी सेवा प्रवेशोत्तर परीक्षेतून सूट देण्याचा आदेश काढला होता. परंतु, या आदेशाच्या दिनांकास एस.बी. हाके यांचे वय ५० वर्ष पूर्ण झाले नव्हते आणि नोकरीची १५ वर्षांची मुदतही संपलेली नव्हती. त्यामुळे त्यांना नियमानुसार या सूटचा लाभ घेण्याचा अधिकार नव्हता. तरीही त्यांनी प्रशासनाची दिशाभूल करून ८ फेब्रुवारी २०१९ रोजी नियमबाह्य सूट घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या गंभीर आरोपामुळे परंडा तालुक्यातील शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे. ‘शिक्षण क्षेत्रातील हा काळा बाजार कोण थांबवणार?’ असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हाके यांच्यावर काय कठोर कारवाई करतात, याकडे परंडा तालुक्यातील नागरिक आणि शिक्षण विभागाचे लक्ष लागले आहे.