मुंबई( प्रतिनिधी) प्रशासनातील भ्रष्टाचारावर पुन्हा एकदा थेट आणि परखड भाषेत प्रहार करत माजी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अधिकाऱ्यांना जाहीरपणे सवाल केला आहे. “तुम्ही भ्रष्टाचाराचा भाग आहात का?” असा थेट प्रश्न विचारत मुंढे यांनी प्रशासनातील उदासीनता, दबावाखाली काम करण्याची वृत्ती आणि जबाबदारीपासून पळ काढण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
एका कार्यक्रमात बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, कायदे, नियम आणि संविधान स्पष्ट असताना जर अधिकारी चुकीच्या गोष्टींना मूकसंमती देत असतील, तर तेही अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचाराचे भागीदार ठरतात. “फक्त लाच घेणारा नव्हे, तर चुकीकडे डोळेझाक करणारा अधिकारीही तितकाच दोषी आहे,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
प्रशासन हे जनतेसाठी असते, राजकीय दबाव किंवा वैयक्तिक सोयीसाठी नव्हे, असे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांना निर्भीडपणे निर्णय घेण्याचे आवाहन केले. “नियम पाळून काम केले तर कोणाची भीती बाळगण्याचे कारण नाही. मात्र नियम झुगारून काम केले तर त्याची जबाबदारी स्वीकारावीच लागेल,” असेही मुंढे म्हणाले.
तुकाराम मुंढे यांच्या या स्पष्ट आणि रोखठोक भूमिकेची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून, अनेक नागरिकांनी त्यांच्या वक्तव्याचे स्वागत केले आहे. प्रशासनातील प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेसाठी अशी भूमिका आवश्यक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.