परांडा | माझं गांव माझं शहर
परांडा तालुक्यातील कपिलापुरी गावावर शुक्रवारी दुःखाचा डोंगर कोसळला. नदीतील विद्युत मोटर बाहेर काढत असताना विजेचा तीव्र शॉक बसून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गाव शोकमग्न झाले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कपिलापुरी येथील शेतकरी अनिल श्रीधर देवळकर (जैन) यांच्या शेतातील विद्युत पंपामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. सदर पंप पाण्यातून बाहेर काढण्यासाठी अनिल देवळकर आणि अक्षय बिभीषण कुंभार हे दोघे पाण्यात उतरले होते. यावेळी अचानक विद्युत प्रवाहाचा तीव्र शॉक लागल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली; मात्र दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
ही दुर्दैवी घटना शुक्रवार, दि. २९ मे रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास आणि आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे.
अक्षय कुंभार हा मदतीसाठी सदैव तत्पर, कोणाच्याही कामाला कधीही नकार न देणारा आणि सर्वांना आपलेसे वाटणारा युवक म्हणून परिचित होता. त्याच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्याने गावातील अनेकांची मने जिंकली होती.
तर अनिल देवळकर हे नम्र, शांत आणि सर्वांशी आदराने व आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या साधेपणा, प्रेमळ स्वभाव आणि सामाजिक जिव्हाळ्यामुळे त्यांनी गावकऱ्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले होते.
दोन उमदे, कर्तृत्ववान आणि मेहनती युवकांच्या अशा अकाली निधनाने कपिलापुरी गाव शोकसागरात बुडाले आहे. त्यांच्या जाण्याने गावाने दोन गुणी, कष्टाळू आणि सर्वांना आपलेसे वाटणारे चेहरे गमावले आहेत. गावात सर्वत्र शोककळा पसरली असून विविध स्तरांतून दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🕯️ स्व. अनिल श्रीधर देवळकर (जैन) व स्व. अक्षय बिभीषण कुंभार यांना विनम्र अभिवादन.
