परंडा,दि.२९ (माझं गांव माझं शहर) राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंडा येथे शनिवारी (दि. २८) रोजी राज्यस्तरीय कुस्त्यांचा भव्य आखाडा रंगला. अंतिम चार लाख रुपयांच्या कुस्तीत मैदानाचे मुख्य आकर्षण असलेला डब्बल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर (नाशिक) व साहील कोहली यांच्यात झालेल्या तुल्यबळ आटीतटीच्या लढतीनंतर कुस्ती बरोबरीत सुटली.तर क्रमांक दोनच्या इनाम रुपये तीन लाखाच्या कुस्तीत मल्ल रविराज चव्हाण याने पोकळ घिस्सा डावावर सुप्रसिद्ध इराणी मल्ल हमीद दिलावर यास चितपट करीत आस्मान दाखविले.
महाराष्ट्र चँपीयन हणमंत पुरी,विजय मांडवे,प्रशांत जगताप यांनी प्रतिस्पर्ध्यास चितपट करीत प्रेक्षणीय विजय मिळविले.
येथील आमदार प्रा.डॉ.सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना युवा तालुका प्रमुख राहुल डोके यांच्यावतीने येथील पंचायत समिती आवारात शनिवारी दुपारी ४ ते रात्री १०.३० वाजेपर्यंत कुस्त्या रंगल्या.शिवसेना संपर्कप्रमुख राजन साळवी व कुस्ती क्षेत्रातील ज्येष्ठ वस्ताद व मान्यवरांच्या उपस्थितीत आखाड्याचे पूजन करून सुरवात करण्यात आली.
या वेळी गिरीराज सावंत, केशव सावंत,शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ता साळुंखे, नगराध्यक्ष जाकीर सौदागर, डबल महाराष्ट्र केसरी,चंद्रहार पाटील,महाराष्ट्र केसरी गोरख सरक,डबल उपमहाराष्ट्र केसरी बाळासाहेब पडघन, उपमहाराष्ट्र केसरी अमृता भोसले (कोल्हापूर) महाराष्ट्र चँपियन आप्पा काशीद,युवा नेते मेघराज पाटील,शिवसेना तालुकाप्रमुख आण्णासाहेब जाधव, निवृत्त क्रिडाशिक्षक शिवाजी कदम, वस्ताद विश्वनाथ काशीद, सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे, नवनाथ जगताप, विशाल देवकर आदी उपस्थित होते.इनाम रुपये दोन लाखाच्या लढतीत बुरुजबंद मल्ल माऊली कोकाटे व बुरुजबंद मल्ल प्रकाश बनकर यांच्यात होवुन अटीतटीच्या घमासान लढतीनंतर पंचानी बरोबरीत सोडली. या कुस्तीमैदानात लहानमोठ्या मल्लांच्या ३५० कुस्त्या घेण्यात आल्या.दुरगावाहुन आलेल्या मल्लांनी डावप्रतिडावांचे युध्द खेळुन प्रतिस्पर्ध्यावर चितपटीने प्रेक्षणीय विजय मिळविले.विजयी मल्लांना प्रेक्षकांनी रोख बक्षिसे दिली.
हलगीसम्राट लक्ष्मण जाधव व सहकाऱ्यांच्या हलगीच्या कडकडाटाने कुस्ती आखाड्यात मोठी रंगत, जोश निर्माण झाला होता. कुस्तीप्रेमी नागरिकांनी विजयी मल्लांना रोख बक्षिसे वाटली. पंच म्हणून उपमहाराष्ट्र केसरी बाळासाहेब पडघण, दिलीप मोरजकर, अप्पा कारंडे, राहुल भांडवलकर, बालाजी मिस्कीन,रामा गोडगे, विशाल देवकर यांनी काम केले. अंतिम कुस्तीतील विजेत्यांना सन्मानचिन्ह पारितोषिक देण्यात आले.
ज्येष्ठ आजी माजी वस्तादमंडळीचा सत्कार करण्यात आला. कुस्ती मैदानाचे खुमासदार समालोचन राजाभाऊ देवकते,धनाजी मदने यांनी केले.या कुस्तीमैदानासाठी प्रेक्षकांसाठी चौहोबाजुने भव्य लक्झरी स्टेज उभरण्यात आले होती.कुस्तीशौकीन, क्रिडाप्रेमींच्या तुंडुब गर्दीने मैदान गजबजुन गेले होते.