परंडा(प्रतिनिधी) शहरात मकरसंक्रातीनिमित्त आठवडा बाजारात वाणाच्या सामानाच्या व्यापाऱ्यानी दुकाने थाटली असून, बाजार फुलून गेला. तर सुगडसह विविध साहित्य खरेदीला महिलांनी गर्दी केली होती.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला महिलांचा सण असलेला मकरसंक्रातीला वाणाचे साहित्य तसेच कुंभार बांधवांनी तयार केलेले सुगड, बोळके आदींची खरेदी करण्यासाठी महिला गर्दी करत आहेत. भाजीपालाही चढ्या दराने विकत घ्यावा लागत आहे. मकरसंक्रातीच्या सणाला प्रामुख्याने हळदी-कुंकू, खोबरे, तीळ, हळकुंड, सुपारी, खारीक, राळे विक्रीसाठी आले आहे. संक्रांतीचा सण दोन दिवसांवर आल्याने स्टेशनरी दुकाने साहित्याने सजली आहेत. संक्रांतीला महिला वाणाची देवाणघेवाण करतात. तसेच हळदी-कुंकासाठी प्रत्येक सुवासिनी ऐकमेकीच्या घरी जातात. विविध प्रकारची भेट या वेळी दिली जाते. मकरसंक्रांतीच्या सणादिवशी महिला विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन वाण देतात. दर्शन घेऊन ऐकमेकीना वाण, तीळगुळ देऊन शुभेच्छा देतात.