परंडा (तानाजी घोडके) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे नाते सर्वश्रुत आहे. असं असताना सर्वांच्या भूवया उंचावतील अशी घटना घडली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. तानाजी सावंत यांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. मंत्रीमंडळाच्या विस्तार होण्याच्या तोंडावर डॉ. सावंत शिंदेंना भेटल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहे. मात्र एकनाथ शिंदे यांचा नियोजित दौरा पुण्यात होता. सहजच उपमुख्यमंत्री शिंदे डॉ. सावंतच्या घरी गेल्याचे समजत आहे. यावेळी या दोन्ही नेत्यामध्ये चर्चाही झाली आहे. मात्र त्याचा तपशील बाहेर येवू शकलेला नाही. शिवसेना पक्ष फुटीनंतर आमदार डॉ. तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी दिलेली भक्कम साथ पाहता शिंदेंनी त्यांना मागील सरकारमध्ये महत्त्वाच्या अशा आरोग्य खात्याची जबाबदारी दिली होती. मात्र, सध्याच्या महायुती सरकारमधील मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नाही . त्यामुळेच डॉ. तानाजी सांवत हे नाराज असल्याचं बोललं जात होतं. अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार डॉ. तानाजी सावंत यांची भेट घेणे ते ही त्यांच्या घरी जावून याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.असे असताना डॉ. तानाजी सावंत याचे चिरंजीव गिरीराज सावंत लवकरच मैदानांत येतील याची जोरदार चर्चा सुरु आहे.