खांडवी, (बार्शी ) २६ जुलै रोजी कारगिल विजय दिनानिमित्त खांडवी येथील जिजाऊ गुरुकुल येथे देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शहीद जवानांना मानवंदना अर्पण करण्यात आली. या विशेष प्रसंगी गुरुकुलचे कॅडेट्स यांनी पायलट मार्चिंग करत अभूतपूर्व शिस्त आणि दर्शन घडवले.
या प्रसंगी जिजाऊ गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष मा. संभाजी घाडगे यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी घटनांचा दाखला देत विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागवली. त्यांनी विद्यार्थ्यांना देशासाठी निस्सीम प्रेम, एकनिष्ठ सेवा आणि राष्ट्ररक्षणाचे मोल समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले गुरुकुलचे फिजिकल कोच मेजर जे. बी. शिंदे यांचे प्रत्यक्ष युद्धातील अनुभव. कारगिलच्या रणभूमीवरील त्यांच्या आठवणी ऐकताना उपस्थितांच्या अंगावर शहारे उभे राहिले. त्यांनी दिलेल्या प्रेरणादायी संदेशातून सेना म्हणजे केवळ शस्त्र नव्हे तर शौर्य, शिस्त आणि सेवा यांचे प्रतीक आहे, हे प्रभावीपणे पटवून दिले.
कार्यक्रमामध्ये देशभक्तीपर गीत, भाषणे, सहिष्णुता व राष्ट्रसेवा या विषयांवर आधारित सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टीने सजग बनवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष मा. संभाजी घाडगे,सचिवा मा. वर्षा घाडगे, डायरेक्टर संदेश कदम, प्राचार्य एम. पी. काझी, प्रशासकीय अधिकारी किशोर कदम, फिजिकल कोच मेजर जे. बी. शिंदे, माजी सैनिक संतोष शिंदे, सर्व समन्वयक, शिक्षकवृंद, आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कारगिल विजय दिन ही केवळ एक तारीख नाही, तर रक्ताने लिहिलेली भारतीय सैन्याच्या पराक्रमाची गाथा आहे, हे विद्यार्थ्यांच्या मनावर कायमचं कोरलं गेलं.