शाळेत दारूच्या नशेत शिक्षकांवर कारवाईची मागणी

चिंचपूर (बु.), ता. परंडा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत एक शिक्षक दारूच्या नशेत शाळेत आल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला. बी. एम. मोहळकर. असे या शिक्षकाचे नाव असून, यापूर्वीही त्यांना अनेकदा नशेत शाळेत न येण्याबद्दल समज देण्यात आली होती. शनिवार दिनांक २८ जून २०२५ रोजी सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी श्री. मोहळकर शाळेत आले. मात्र, ते मद्यपान करून आल्याचे आणि शिकवण्याच्या अवस्थेत नसल्याचे मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आले. मुख्याध्यापकांनी तात्काळ ही बाब शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना फोनद्वारे कळवली.घटनेचे गांभीर्य ओळखून समिती अध्यक्ष, गावाचे सरपंच महेश देवकर, इतर सदस्य आणि काही पालक शाळेत दाखल झाले. सर्वांनी परिस्थितीची पाहणी केली असता, संबंधित शिक्षक खरंच मद्यधुंद अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले. या संपूर्ण प्रकाराचे शाळा व्यवस्थापन समितीने मोबाईलद्वारे व्हिडिओ चित्रण केले आहे.
या घटनेची माहिती गटविकास अधिकारी यांना फोनवरून देण्यात आली असून, शाळेच्या मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती परांडा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. यापूर्वी अनेकदा सूचना देऊनही संबंधित शिक्षकाच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने, आता प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

error: Content is protected !!