माझं गांव माझं शहर (दि.१८) परंडा तालुक्यातील शिराळा शिवारात अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर महसूल विभागाच्या गौणखनिज प्रतिबंधक पथकाने पाठलाग करून जप्त केला. ही कारवाई १७ जून रोजी सकाळी सुमारे ७ वाजता करण्यात आली. जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर पुढील दंडात्मक कारवाईसाठी परंडा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिराळा परिसरात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक सुरू असल्याची माहिती गौणखनिज प्रतिबंधक पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने तातडीने शिराळा परिसरात धाव घेतली.
दरम्यान, गावाजवळ लाल रंगाचा अर्जुन (605) कंपनीचा ट्रॅक्टर वाळू भरून जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. महसूल पथकाची गाडी पाहताच चालकाने ट्रॅक्टर कच्च्या रस्त्याने पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने तत्काळ पाठलाग केल्याने घाबरलेल्या चालकाने गट क्रमांक ४२ मधील शिवारात ट्रॅक्टर सोडून पलायन केले.
ट्रॅक्टरची तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे अर्धा ब्रास वाळू आढळून आली. प्राथमिक चौकशीत सदर ट्रॅक्टर शिराळा येथील श्रीकृष्ण दत्तात्रय नवले यांच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाले.
संबंधित चालकाकडे वाळू उत्खनन अथवा वाहतुकीसाठी आवश्यक परवाना किंवा रॉयल्टी पावती नसल्याचे आढळून आले. त्यामुळे ही वाहतूक पूर्णपणे अवैध असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर महसूल पथकाने पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने ट्रॅक्टर (इंजिन क्र. CHZZ322, चेसिस क्र. 006504668-11, विना क्रमांक) जप्त करून परंडा पोलीस ठाण्यात जमा केला.
या कारवाईत नायब तहसीलदार विजयकुमार बाडकर, मंडळ अधिकारी आबासाहेब सुरवसे, ग्राम महसूल अधिकारी तुकाराम जाधव, डी. के. वाळके आणि विष्णू साळुंके यांनी सहभाग घेतला.
गौणखनिज प्रतिबंधक पथकाच्या या धडक कारवाईमुळे अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
