मानधनासाठी पंचायत समितीत ठिय्या; सदस्यांच्या मागणीला प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद

परंडा (प्रतिनिधी) तानाजी घोडके : कुंभेफळ (ता. परंडा) ग्रामपंचायतीच्या सदस्यांना गेल्या पाच वर्षांपासून हक्काचा सदस्य भत्ता (मानधन) मिळाला नसल्याने संतप्त झालेल्या सदस्यांनी मंगळवारी थेट परंडा पंचायत समिती गाठून गटविकास अधिकारी (बीडीओ) गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी सदस्यांनी आपली व्यथा मांडत प्रलंबित भत्त्याची मागणी लावून धरली. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी येत्या दोन दिवसांत सदस्यांचे प्रलंबित मानधन त्यांच्या खात्यावर जमा करण्याबाबत आदेश देण्याचे आश्वासन दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, कुंभेफळ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक सन २०२१ मध्ये पार पडली होती. या निवडणुकीत लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सदस्यांना अद्यापपर्यंत त्यांचा सदस्य भत्ता मिळालेला नाही. याबाबत सदस्यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागला नव्हता.

सततच्या दिरंगाईमुळे अखेर ग्रामपंचायत सदस्य पदमीन यादव, कौशल्या नरसू नायकोडे आणि आजूम फकीर पठाण यांनी आज परंडा पंचायत समितीत धाव घेतली. गटविकास अधिकारी गायकवाड यांच्यासमोर त्यांनी प्रलंबित मानधनाचा मुद्दा ठामपणे मांडला. सदस्यांच्या मागणीची दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोन दिवसांत भत्ते वितरित करण्याचे आश्वासन दिले.

अनेक वर्षांपासून रखडलेल्या मानधनाचा प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसत असल्याने सदस्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, प्रशासनाने दिलेले आश्वासन वेळेत पूर्ण न केल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, असा इशाराही सदस्यांनी दिला.

या घटनेमुळे परंडा पंचायत समिती परिसरात काही काळ चर्चांना उधाण आले होते.

error: Content is protected !!