पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती शैक्षणिक साहित्य देत त्यांचा आत्मविश्वास वाढविणाऱ्या इन्सानियत फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक .

परंडा प्रतिनिधी :- तानाजी घोडके

परांडा, दि. १५ जून : नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा उपक्रम इन्सानियत फाऊंडेशन, परांडा यांच्या वतीने राबविण्यात आला. फाऊंडेशनतर्फे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना दफ्तर, वह्या, पेन तसेच विविध शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.

या उपक्रमाचे उद्घाटन व साहित्य वितरण परांड्याचे कायम नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.

यावेळी बोलताना जाकीरभाई सौदागर यांनी शिक्षण हेच समाजाच्या प्रगतीचे खरे साधन असल्याचे सांगत, प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. आर्थिक अडचणींमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, हीच इन्सानियत फाऊंडेशनची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.

इन्सानियत फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला असून भविष्यातही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.

एका हाताने द्या, लाख हाताने घ्या” या उदात्त विचाराला अनुसरून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे विद्यार्थ्यांनी, पालकांनी तसेच नागरिकांनी स्वागत केले. सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण क्षेत्रात केलेले हे योगदान निश्चितच अनेक विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती शैक्षणिक साहित्य देत त्यांचा आत्मविश्वास वाढविणाऱ्या इन्सानियत फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!