परंडा : येथील महात्मा गांधी विद्यालय, परंडा येथे इयत्ता 5 वी ते 10 वीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी आयोजित करण्यात आलेल्या या स्वागत समारंभात विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबत प्रेरणा देत त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत नियमित अभ्यास, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. काशीद बी. जी. यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून शाळेत उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक सुविधा व उपक्रमांची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतामुळे विद्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
