करमाळा माझं गांव माझं शहर | प्रतिनिधी
करमाळा-अहिल्यानगर मार्गावरील जातेगाव परिसरात रविवारी (दि.१७) सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. शिर्डीहून अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी निघालेल्या एर्टिगा कारची करमाळाहून अहिल्यानगरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकशी समोरासमोर जोरदार धडक झाली. या दुर्दैवी अपघातात सहा ते सात महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एर्टिगा कारमधून एकाच कुटुंबातील तीन महिला, तीन पुरुष तसेच लहान बालके प्रवास करत होते. जातेगाव परिसरातून जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकशी कारची जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की कारच्या पुढील भागाचा पूर्ण चुराडा झाला. धडकेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून तातडीने करमाळा येथील स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र गंभीर जखमी झालेल्या सहा ते सात महिन्यांच्या चिमुकलीचा रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
या अपघातात कार चालकासह त्याच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीस गंभीर दुखापत झाली असून इतर काही प्रवासी देखील जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
दरम्यान, घटनास्थळी मदत करणाऱ्या स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालकाने विना इंडिकेटर अचानक वळण घेतल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र अपघाताचे नेमके कारण पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
या घटनेमुळे जातेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
