धाराशिव माझं गांव माझं शहर| प्रतिनिधी
डॉ. चंद्रकलादेवी पद्मसिंह पाटील ग्रंथालय व तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्राच्या माध्यमातून सन २०२६ मध्ये तब्बल १४ विद्यार्थ्यांनी विविध शासकीय पदांवर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील होतकरू व जिद्दी विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरलेल्या या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
आदरणीय डॉ. साहेबांच्या दूरदृष्टी आणि प्रेरणेतून सन २०१४ पासून सुरू झालेल्या या उपक्रमाने गेल्या अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञान, मार्गदर्शन आणि आत्मविश्वास देण्याचे कार्य सातत्याने सुरू ठेवले आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी हे अध्ययन केंद्र अत्यंत उपयुक्त ठरत असून, येथून घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध शासकीय सेवांमध्ये कार्यरत आहेत.
यंदा यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अतुल करवर यांची महसूल सहाय्यकपदी निवड झाली असून, अविनाश वाघमारे, अभिजित ओव्हाळ, रामलिंग निलाखे, कृष्णा कुंभार तसेच शंकर पालखे यांनी पोलीस दलात निवड मिळवून संस्थेच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांच्या अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीचे कौतुक करत पुढील शासकीय सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी अध्ययन केंद्राचे व्यवस्थापक श्री. विठ्ठल गायकवाड तसेच सहकारी कर्मचाऱ्यांचाही सत्कार करून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा, दर्जेदार अभ्यासाचे वातावरण आणि प्रेरणा मिळाल्यास ते कोणतेही यश मिळवू शकतात, हे या यशस्वी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.
