माझं गांव माझं शहर | विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेचा निकाल शुक्रवार, दि. ०८ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थी व पालकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांसह विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे.
विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी खालील संकेतस्थळांचा वापर करता येणार आहे :
- results.digilocker.gov.in
- mahahsscboard.in
- sscresult.mkcl.org
- results.targetpublications.org
- results.navneet.com
तसेच विद्यार्थ्यांना डिजिलॉकर अॅपवर डिजिटल गुणपत्रिका डाउनलोड करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. शाळांना त्यांचा एकत्रित निकाल मंडळाच्या ‘इन स्कूल लॉगिन’ प्रणालीद्वारे पाहता येणार आहे.
निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती तसेच पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार असल्याची माहिती मंडळाने दिली आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया १० मे २०२६ पासून सुरू होणार असून विद्यार्थ्यांना शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहे.
दरम्यान, निकालाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी इंटरनेट सेंटर व सायबर कॅफेमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांनी शांतपणे निकाल पाहून पुढील शैक्षणिक वाटचालीचे नियोजन करावे, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
