धाराशिवमध्ये आत्मदहन प्रकरणातील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

माझं गाव माझं शहर-परंडा | धाराशिव प्रतिनिधी

धाराशिव शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

महाराष्ट्र दिनानिमित्त प्रशासकीय इमारतीत ध्वजारोहण कार्यक्रम सुरू असताना संबंधित महिलेने स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. या घटनेत त्या सुमारे ७० टक्के भाजल्या होत्या. घटनेनंतर पोलीस आणि प्रशासनाने तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला भूविकास बँकेत कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या. बँकेवर प्रशासक नेमण्यात आल्यानंतर त्यांच्या नोकरीसह थकीत वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता. “आम्हाला बँकिंग क्षेत्रात समाविष्ट करा आणि आमचे प्रलंबित वेतन तातडीने द्या,” अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे वारंवार केली होती. यासंदर्भात त्यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचाही प्रयत्न केला होता.

मात्र, त्यांच्या मागण्यांवर योग्य वेळी निर्णय न झाल्याने त्या मानसिक तणावाखाली असल्याची माहिती समोर आली आहे. आत्मदहनापूर्वी त्यांनी प्रशासनाला इशाराही दिला होता, अशी चर्चा असून त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची वेळेत दखल घेतली का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

या दुर्दैवी घटनेनंतर विविध सामाजिक, कर्मचारी व राजकीय स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

error: Content is protected !!