अवकाळी पावसाचा कहर : सिरसाव परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, तातडीच्या मदतीची मागणी

माझं गाव माझं शहर | परंडा तालुक्यातील सिरसाव परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पपई, पेरू, मका, केळी, आंबा तसेच इतर फळबागा आणि उभी पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अनेक ठिकाणी फळबागा उन्मळून पडलेल्या दिसल्या, तर उभ्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले.

यावेळी सावंत यांनी तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. तसेच जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळावी, यासाठी पाठपुरावा केला.

“शेतकऱ्यांनी वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक काही क्षणांत नष्ट झाले आहे. अशा वेळी शासनाने संवेदनशील भूमिका घेत तातडीने आर्थिक मदत द्यावी,” असे मत धनंजय सावंत यांनी व्यक्त केले.

या पाहणी दौऱ्यात शेतकरी शहाजी मिसाळ, तानाजी जाधव, नवनाथ मिसाळ, चन्नश्याम गावके, अनिल चव्हाण यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. तसेच माजी जि.प. सदस्य गौतम लटके, जयदेव गोफणे, पंचायत समिती सदस्य केदार पाटील, सोमनाथ हांगे, आकाश नवले, कांदलगाव सरपंच मगनदास पवार, आसू सरपंच शशिकांत खुळे, अरंगाव सरपंच युसुफ पठाण, विष्णू सांगळे, भागवत डाकवले, विकास देवकते, बालाजी कांबळे, महेश अंधारे, बंडू वायकुळे, अभिजीत चव्हाण आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवकाळी पावसामुळे झालेल्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले असून शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!