माझं गाव माझं शहर | परंडा , दि. १९ — परंडा तहसील कार्यालयासमोर घडलेल्या एका वादग्रस्त घटनेमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कामकाज ठप्प झाले आहे.
माहितीनुसार, नदीपात्रातील अवैध वाळू उपशाबाबत तक्रार करण्यासाठी आलेल्या एका तक्रारदाराने तहसीलदारांशी वाद घालत त्यांच्या वाहनास अडवून शाब्दिक चकमक केल्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून त्यामुळे नागरिकांना विविध प्रशासकीय कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बोटींमार्फत अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या प्रकरणात संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांमधून होत आहे. तसेच, घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे तहसील कार्यालयातील वातावरण तणावपूर्ण झाले असून प्रशासनाने तातडीने तोडगा काढून कामकाज सुरळीत करण्याची गरज व्यक्त होत आहे.
