परंडा शहरात विना परवानगी उभारलेले पुतळे सन्मानपूर्वक काढा : प्रशासनाचे आवाहन

माझं गाव माझं शहर | परंडा प्रतिनिधी :- परंडा शहरात शासनाची परवानगी न घेता उभारण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे सन्मानपूर्वक काढावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. परंडा येथे पार पडलेल्या शांतता समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले तसेच तहसीलदार काकडे यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी पुतळा उभारण्यासाठी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करून उभारलेले पुतळे कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याने ते स्वयंस्फूर्तीने हटविणे गरजेचे आहे. अन्यथा प्रशासनाकडून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

यावेळी उपस्थित नागरिक, पदाधिकारी व विविध संघटनांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासनाने केले.

बैठकीस माजी आमदार, नगराध्यक्ष, विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, नगर परिषद प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित राहिल्याची चर्चा देखील बैठकीत झाली.

शहरात शांतता राखून कायदेशीर मार्गानेच महापुरुषांच्या पुतळ्यांबाबत निर्णय घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

error: Content is protected !!