परंडा, दि. २ (माझं गाव माझं शहर) – येथील पुरातन भवानी शंकर मंदिरात काळा मारूतीच्या चैत्र पौर्णिमा हनुमान जन्मोत्सवानिमित्त गुरुवारी विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. पहाटेपासूनच नागरिक व महिलांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
हनुमान जन्मोत्सवानिमित्त पहाटे विधीवत पंचोपचार व अभिषेक पूजन करण्यात आले. सूर्योदयाच्या वेळी गुलाल उधळून सकाळी ६ वाजून ३३ मिनिटांनी आरती करण्यात आली आणि उत्साहात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मंदिरातील दक्षिणमुखी, अखंड काळ्या पाषाणातील चतुर्भुज वीर मारूतीची मूर्ती नवसाला पावणारी म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे.
मंदिराचे विश्वस्त पुजारी पंडित किशोर बैरागी महाराज व कपिल बैरागी यांनी आरती केल्यानंतर लाडू, जिलेबी, पेढे तसेच चणाडाळ यांचा प्रसाद भाविकांना वितरित करण्यात आला.
यावेळी उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, सुबोधसिंह ठाकूर, महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान आप्पा काशीद, सुनील शुक्ला, श्यामा मिश्रा, विशाल काशीद, संकेत ठाकूर, गोरख देशमाने, राजकुमार पाटील, सुरज ठाकूर, सुबोध देशमुख, विरेंद्र (बॉबी) काशीद, सागर काशीद तसेच ज्येष्ठ महिला गायिका सिंधूबाई शुक्ला यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे युवक, नागरिक व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान हनुमान चालिसा, रामचरित्र तसेच वीर हनुमान पुराणाचे वाचन करण्यात आले. या मंदिरात अखंड “सुंदर कांड” पठण सुरू असते, ही विशेष बाब आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवारी दि. ५ एप्रिल रोजी शहरातील लाल मारूती मंदिर ते भवानी शंकर मंदिर दरम्यान भव्य मिरवणुकीद्वारे “रथोत्सव” साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर विश्वस्त किशोर बैरागी यांनी दिली. या निमित्ताने रथमार्गावर भगवे झेंडे व पताका लावण्यात येणार असून उत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
तसेच मंगळवार दि. ३१ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान शहरातील काशीद मळा येथे शिवकथापुराण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
याशिवाय शहरातील लाल मारूती मंदिर तसेच समसमपुरा मारूती मंदिर, कुर्डुवाडी रोड येथेही हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.