सहकार क्षेत्राच्या माध्यमातून राज्यात पहिल्यांदाच उदंचन जलविद्युत प्रकल्पाची निर्मिती होणार

मुंबई(प्रतिनिधी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विधान भवन, मुंबई येथे जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन आणि ‘श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्था, वारणानगर’ यांच्यामध्ये तिल्लारी उदंचन जलविद्युत प्रकल्पासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.

महाराष्ट्राने वीजेच्या क्षेत्रात गेल्या दोन-तीन वर्षात उल्लेखनीय काम केले असून, येत्या काळात अपारंपारिक ऊर्जा स्त्रोताचे महत्व आणि आवश्यकता वाढणार आहे. त्यापार्श्वभूमीवर तिल्लारी उदंचन जलविद्युत प्रकल्प हा अपारंपारिक ऊर्जा स्रोतात भर घालणारा उपयुक्त प्रकल्प ठरणार असून, सहकार क्षेत्राच्या माध्यमातून पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रकल्प राज्यात होत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, भविष्यातील वीजेचा वाढता वापर लक्षात घेता पंप स्टोरेज आवश्यक ठरणार असून, त्याची वीज गरजेनुसार आणि आवश्यक तेवढ्या प्रमाणात वापरता येते. पंपस्टोरेजची उपयुक्तता लक्षात घेऊन राज्य शासनाने या संदर्भात 65,000 मेगावॅट क्षमतेचे सामंजस्य करार केले आहेत. तसेच याला 1,00,000 मेगावॅट क्षमतेपर्यंत नेण्याचे शासनाचे नियोजन आहे. त्याचसोबत भविष्यातील पर्यायी व्यवस्था म्हणून मोठ्या प्रमाणात पारेषणात गुंतवणूक करुन सन 2035 पर्यंत कॉरीडॉर उभे करावे लागणार आहे, त्यादृष्टीने राज्य शासन पारेषणात ₹1,00,000 कोटींची गुंतवणूक करत आहे.

या सर्वात पंप स्टोरेजची भूमिका महत्वपूर्ण असणार आहे. पश्चिमी घाटामुळे पंपस्टोरेज निर्मितीसाठी अतिशय चांगली संधी प्राप्त झाली असून, वारणा समूहाने ज्याप्रमाणे सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम करुन सहकारातील एक अग्रणी संस्था म्हणून वारसा निर्माण केला आहे. त्याच पद्धतीने या जलविद्युत प्रकल्पासाठी देखील ते भरीव योगदान देऊन, प्रकल्प गतीमानतेने पूर्ण करण्यात पुढाकार घेतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. यापुर्वी 15 अभिकरणासमवेत यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आले असून, एकूण 45 प्रकल्पांद्वारे 62,125 मेगावॅट वीज निर्मिती तसेच ₹3.41 लाख कोटींच्या गुंतवणुकीतून 96,190 रोजगार निर्मिती होणार आहे.

तिल्लारी उदंचन जलविद्युत प्रकल्पाची माहिती :

✅ उदंचन जलविद्युत प्रकल्पाद्वारे 240 मेगावॅट वीजनिर्मित्ती अपेक्षित
✅ ₹1,008 कोटींची गुंतवणूक व 300 मनुष्यबळ रोजगार निर्मिती
✅ प्रकल्पाचे वरील बाजुचे धरण (Upper Dam) कोदाळी धरण (ता. चंदगड, जि. कोल्हापूर)
✅ खालील बाजुचे धरण (Lower Dam) मौजे केंद्रे (ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग)
✅ योजनेतील पाणीसाठ्याच्या वापरासाठी प्रति जलाशय ₹1.33 लाख प्रति मेगावॅट वार्षिक भाडे, औद्योगिक दराने पाणी शुल्क आणि जागेचे वार्षिक भाडे आकारले जाणार

यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. डॉ. विनय कोरे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!