धाराशिवकरांनी ” पुढच्या वर्षी लवकर या ” च्या जयघोषात गणरायाला निरोप दिला.

धाराशिव (माझं गांव माझं शहर ) मागील 10 दिवस लाडक्या श्री गणेशाच्या आगमनामुळे घरोघरी व सार्वजनिक गणेश मंडळाच्या मंडपात उत्साहाचे , आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. शहरातील सार्वजनिक मंडळांनी व घरोघरी देखील शहरवासियांनी विविध प्रकारे श्री गणरायासमोर विविध देखावे सादर करून तसेच विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून मोठ्या जल्लोषात गणेश उत्सव साजरा केला. शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी वाजत गाजत , ढोल ताशाच्या गजरात आणि ” गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ” अशी श्री गणरायास साद घालत समस्त धाराशिवकरांनी लाडक्या गणरायास वाजत गाजत निरोप दिला. शहरातील जिजाऊ चौक , लेडीज लेडीज क्लब, जिल्हाधिकारी निवासस्थान, काळा मारुती , चौक माऊली चौक, देशपांडे स्टँड , तसेच मध्यवर्ती प्रशासकीय ईमारत , सांजा चौक , या मार्गावरुन गणेश मंडळांच्या मिरवणूका छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल होत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावरुन अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या श्री गणरायाच्या मिरवणुका काढल्या. पारंपारिक लेझीम , ढोल ताशा , पंजाबी भांगडा, आदीसह विविध कला व क्रीडा प्रकार , साहसी खेळ मिरवणूकीतील सहभागी गणेश मंडळाच्या उत्साही कार्यकर्त्यांनी सादर केले. मिरवणूक मार्गावर श्री गणेशाची मिरवणूक पाहण्यासाठी शहरवासियांनी गर्दी केली होती. समता कॉलनीतील श्री विसर्जन विहिरीत श्री गणेश विसर्जनासाठी नगरपालिका प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने योग्य ती सुविधा निर्माण केली होती. अनेक शहरवासियांनी श्री विसर्जन विहिरीमध्ये तर काहींनी हातलाई तलावामध्ये श्री गणरायाचे विसर्जन केले. मिरवणूक मार्गावर सहभागी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचे व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे भाजपाचे युवा नेते मल्हार पाटील , जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नितीन काळे, शहराध्यक्ष अमित शिंदे, अँड. नितीन भोसले , अक्षय ढोबळे, नितीन शेरखाने , पांडुरंग लाटे आदिसह इतर पदाधिकाऱ्यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत व सत्कार केला. तर भाजपाच्या वतीने उत्कृष्ट शिस्तबद्ध मिरवणुकीसाठी गणेश मंडळासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने देखील गणेश मंडळाच्या उत्कृष्ट मिरवणुकीसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणूक मार्गावर प्रत्येक गणेश मंडळाचे स्वागत व सत्कार खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनी केले. लाडक्या गणरायास वाजत गाजत समस्त धाराशिवकरांनी ” पुढच्या वर्षी लवकर या ” च्या जयघोषात निरोप दिला.

Leave a Reply

error: Content is protected !!