तुळजापूर तालुक्यात अतिवृष्टीने सोयाबीनचे मोठे नुकसान: एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही – खा. ओमराजे निंबाळकर

तुळजापूर(माझं गांव माझं शहर) तालुक्यातील सावरगाव आणि परिसरातील गावांमध्ये सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. तसेच, एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करताना खा. राजेनिंबाळकर म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या मेहनतीचे पीक प्रतिकूल हवामानामुळे पूर्णपणे हानीग्रस्त झालेले पाहून मन खिन्न झाले आहे.” त्यांनी प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळवून देण्याची मागणी केली. तसेच, शासनाने या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देऊन त्वरित दिलासा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना मदत कार्यात कोणताही विलंब होऊ नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या. “पावसामुळे झालेले नुकसान भरून निघणारे नाही, पण शेतकऱ्यांच्या या अडचणीच्या काळात त्यांच्या सोबत उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. शासनाने तातडीने मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,” अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, सावरगाव व्यतिरिक्त तालुक्यातील इतर गावांमध्येही सोयाबीनसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, लवकरात लवकर पंचनामे पूर्ण होऊन सरकारी मदत मिळेल, या अपेक्षेत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!