अहिल्यानगर (माझं गांव माझं शहर) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या जीसीसी-टीबीसी टायपिंग परीक्षेतील पेपर तपासणीतील मोठ्या गैरव्यवहाराविरोधात अहिल्यानगर जिल्ह्यातील सुमारे २० संस्थाचालक आणि शेकडो विद्यार्थी पुणे येथील परीक्षा परिषद कार्यालयात धडक देऊन अध्यक्ष पालकर साहेबांकडे निवेदन सादर केले.
संस्थाचालकांनी निवेदनातून नमूद केले की, विनर कंपनीच्या चुकीच्या पेपर तपासणीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तसेच आर्थिक नुकसान होत आहे. ६ ते ८ महिने मनापासून सराव केलेले विद्यार्थी परीक्षेत सर्व चुका दुरुस्त करूनही ‘स्पीड पॅसेज’ मध्ये शून्य गुण मिळाल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. तसेच उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती उशिरा मिळतात आणि रिमार्कमध्ये ‘No Change’ दिले जाते, हे देखील संशयास्पद असल्याचे संस्थाचालकांनी सांगितले.
संस्थाचालकांनी पुढे सांगितले की, ग्रामीण भागातील दूरवरच्या केंद्रांवर परीक्षा दिल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वीज पुरवठा खंडित होणे, इंटरनेट स्पीड कमी असणे, संगणक व सॉफ्टवेअरची अकार्यक्षमता, प्रशिक्षित आयटी शिक्षकांचा अभाव यामुळे अनेक विद्यार्थी नापास होत आहेत.
काल झालेल्या चर्चेदरम्यान संस्थाचालकांनी अध्यक्ष पालकर यांच्यासमोर थेट प्रश्न मांडले –
- स्पीड वेळेत पूर्ण करूनही विद्यार्थ्यांना शून्य गुण कसे मिळू शकतात?
- मराठी टायपिंगमध्ये अक्षरे तुटणे, अर्धवट दिसणे, जास्त अक्षरे डिलीट होणे याला कोण जबाबदार?
- उत्तरपत्रिकांच्या प्रती उशिरा मिळणे आणि त्यातील निकालाबाबत शंका.
- परीक्षा केंद्र निवडताना मूलभूत सुविधा न देता विद्यार्थ्यांना त्रास का दिला जातो?
- विद्यार्थ्यांनी टाईप केलेल्या स्पीड पॅसेजची प्रिंट परीक्षा संपल्यानंतर तत्काळ विद्यार्थ्यांना देण्यात यावी.
- प्रमाणपत्राची गुणवत्ता एकसारखी राहावी आणि ती डुप्लिकेट होऊ नये यासाठी अद्वितीय क्रमांक असलेले व छेडछाड न करता येणारे प्रमाणपत्र परीक्षा परिषदेकडूनच प्रिंट करून देण्यात यावे.
- परीक्षा केंद्र निवडताना संगणक, इंटरनेट, वीज, प्रशिक्षित शिक्षक व इतर सर्व सुविधा तपासूनच परीक्षा केंद्र निश्चित करण्यात यावे.
अध्यक्ष पालकर यांनी संस्थाचालकांचे म्हणणे ऐकून घेतले मात्र कोणताही ठोस प्रतिसाद न देता केवळ विचार करून पुढील कार्यवाही करू असे आश्वासन दिले.
संस्थाचालकांच्या मते, परीक्षा परिषद आणि त्यातील अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या व संस्थांच्या समस्या न सोडवता विनर कंपनीला पाठीशी घालत आहेत, ही विद्यार्थ्यांच्या भविष्याशी मोठी अन्यायकारक बाब आहे.
संस्थाचालकांनी स्पष्ट इशारा दिला की, विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही तर सर्व विद्यार्थी न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे. जीसीसी-टीबीसी कोर्स वाचवण्यासाठी सर्व संस्थाचालक व विद्यार्थी एकत्रितपणे लढा देणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या सभेस जालिंदर चौरे, ऍड. विठ्ठल बडे, गिरमकर सर, अभिजीत भुतकर, मनोज काळे, अतुल ढवळे, दीपक घेवारी, प्रदीप नालकुल, संतोष गायकवाड, चव्हाण सर, आकाश नगरे, ऍड. स्वाती जाधव, श्रीमती शिला गवळी, रेखा चौरे, शीतल पवार आदी मान्यवर संस्थाचालक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.