धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्या, माजी मंत्री मधुकरराव चव्हाणांची मागणी.

तुळजापूर(माझं गांव माझं शहर) : धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, शासनाने निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टरी ५०,००० रुपयांची आर्थिक मदत तात्काळ जाहीर करावी, अशी जोरदार मागणी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केली आहे. मंगळवार, दि. १९ ऑगस्ट रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन, उडीद, मूग आणि कांदा यांसारखी सर्वच खरीप पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. प्रशासनाने पंचनाम्याचे आदेश दिले असले तरी, पिकांचे १०० टक्के नुकसान झाल्याने पंचनाम्याची गरज नसून सरसकट मदतीची आवश्यकता असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. खते, बियाणे, औषधे आणि मशागतीसाठी केलेला खर्च वाया गेला आहे. या मोठ्या आर्थिक संकटातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी आणि रब्बी हंगामाचे नियोजन करण्यासाठी शासनाच्या मदतीची नितांत गरज आहे, असेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांप्रति सहानुभूतीपूर्वक विचार करून, शासनाने दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेवेळी पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी गायकवाड आणि बबन जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!