कोल्हापूर(माझं गांव माझं शहर) भारताचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उदघाटन संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संबोधनात 50 वर्षांच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या लढ्याचा संपूर्ण घटनाक्रम उलगडला.
मुख्यमंत्री म्हणाले की, देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या पुढाकारामुळेच आजचा हा ऐतिहासिक सोहळा शक्य झाला आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री यांनी कृतज्ञता व्यक्त केली तसेच या सोहळ्यात खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळाल्याचा आनंद असल्याचेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सर्किट बेंचच्या स्थापनेसाठी कॅबिनेटचा निर्णय, शिष्टमंडळाच्या भेटी हे महत्त्वाचे ठरले. मात्र, या संकल्पनेला प्रत्यक्ष स्वरूप देण्याचा खरा पुढाकार हा सरन्यायाधीश भूषण गवई यांचा असून, त्यांनी जागेची खातरजमा करून सातत्याने याबाबत पाठपुरावा केला.
यासंदर्भात विधी व न्याय विभागासह संबंधित प्रशासकीय विभागांनीही अतिशय तत्परतेने उत्कृष्ट कार्य केल्याचे मुख्यमंत्री यांनी नमूद केले. जमीन हस्तांतरित झाल्यामुळे आराखडा मिळताच खंडपीठाच्या इमारतीच्या कामाला सुरुवात होणार आहे. कोल्हापूरमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळात ज्या ठिकाणी न्यायदान चालायचे, त्याच परिसरात आता आधुनिक सर्किट बेंचची इमारत उभारली जाणार असल्याचे, मुख्यमंत्री म्हणाले. कोल्हापूरच्या सर्किट बेंचचे शिवधनुष्य सक्षमतेने पेलल्याबद्दल सरन्यायाधीश भूषण गवई यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करत मुख्यमंत्री यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री नितेश राणे, मंत्री उदय सामंत, मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती व इतर मान्यवर उपस्थित होते.