जामखेड तालुक्यातील नायगाव येथील विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करून जीवन संपवले. रुपाली नाना उगले (वय २५), मुलगा समर्थ उगले (वय ६), साक्षी उगले (वय ४) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी खर्डा पोलिस स्टेशनमध्ये चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
रूपालीचे वडील शिवाजी श्रीरंग सकुंडे (वय ५०, रा. राळेसांगवी, ता. भूम, जि. धाराशिव) यांनी खर्डा पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली. रूपालीचा पती नाना प्रकाश उगले, प्रकाश पंढरीनाथ उगले, मनीषा शिवाजी टाळके, शिवाजी गोरख टाळके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास खर्डा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत करत आहेत.
रूपाली हिचे आठ वर्षांपूर्वी नाना पंढरीनाथ उगले (रा. नायगाव) याच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांना दोन मुले झाली. दोन-तीन वर्षांनंतर रूपालीस सासरच्या लोकांकडून त्रास देण्यास सुरुवात झाली. मागील दोन वर्षांपूर्वी रूपालीची सासू मयत झाल्यानंतर तिच्या घरातील कामे करण्यावरून, विहीर खोदण्यासाठी, घर बांधण्यासाठी पाच लाख रुपये माहेरून आणण्यासाठी तिचा छळ होत होता. पैशासाठी सासरच्या मंडळींकडून वारंवार त्रास होत होता. नणंद मनीषा शिवाजी टाळके ‘भावाला दुसरे लग्न करून देईन, तुला काही कामे येत नाहीत म्हणून सतत टोमणे मारत होती. ८ जुलै रोजी सायंकाळी नायगाव येथील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली.