बीड (प्रतिनिधी) – लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी आयुष्यभर ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी व बीड जिल्ह्याच्या विकासासाठी काम केले. पुढील पिढीमध्ये धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडे हे त्यांच्या या कामाचा वसा घेऊन काम करत आहेत. धनंजय सामाजिक न्याय खात्याचे मंत्री असताना ऊसतोड कामगारांच्या उन्नतीसाठी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करून त्याद्वारे धनंजय मुंडे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. अर्थमंत्री म्हणून मी या महामंडळाला धनंजय च्या विनंतीवरून कायमस्वरूपी निधी मिळण्याची तरतूद करून दिली. धनंजय च्या प्रयत्नातून उभे राहिलेले हे महामंडळ ऊसतोड कामगारांच्या उन्नतीचे माध्यम ठरणार आहे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांनी आज बीड येथील कार्यक्रमात बोलताना केले.
सामाजिक न्याय विभाग व बीड जिल्हा परिषदेच्या संयुक्त प्रयत्नातून ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्यासाठी खास मिशनसाठी या अभियानाचा शुभारंभ अजितदादा यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला तसेच या निमित्ताने ऊसतोड कामगारांच्या आरोग्य तपासणी बाबतचे शिबिरही आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी अजितदादा पवार आपल्या मनोगतामध्ये बोलत होते.
धनंजय च्या कार्यकाळात या महामंडळाच्या माध्यमातून विविध योजनांचा आरंभ करण्यात आला. ऊसतोड कामगारांच्या अपघातामध्ये मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची योजना आपण सुरू केली. मात्र एखाद्या कर्त्या व्यक्तीचा जीव गेल्यानंतर पाच लाखांचे रक्कम ही अपुरी असल्यामुळे या रकमेत दुप्पट वाढ करावी अशी ही विनंती धनंजय मुंडे यांनी केली होती ती विनंती आपण मान्य केली असून याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल असेही यावेळी बोलताना अजितदादा पवार म्हणाले.
दरम्यान मिशन साथिया योजनेच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांच्या गट (टोळी) मधील एका महिलेला याबाबतचे प्रशिक्षण व आरोग्य किट दिली जाणार असून अशा एक हजार किटचे वितरण आज करण्यात आले. मिशन साथिया उपक्रमामुळे ऊसतोड कामगार महिलांच्या ऊस तोडणी हंगामामध्ये बाहेरगावी असताना आरोग्याची काळजी घेण्यास मदत होणार आहे.
याप्रसंगी आ. धनंजय मुंडे, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ. नमिता मुंदडा, आ. विजयसिंह पंडित, कल्याणराव आखाडे, डॉ. योगेश क्षीरसागर, माधव निर्मळ, अविनाश नाईकवाडे, सचिव राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन रहमान यांसह आदी उपस्थित होते.