परंडा तालुक्यात पुरात अडकलेल्या २७ नागरिकांना खासदार ओमराजे निंबाळकरांच्या प्रयत्नाने लष्कराच्या हेलिकॉप्टरने वाचवले.

धाराशिव: परंडा तालुक्यातील लाखी गावात अतिवृष्टीमुळे पुरात अडकलेल्या २७ नागरिकांना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या जलद प्रयत्नांमुळे लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. आज पहाटेपासून सुरू झालेल्या या थरारक बचावकार्याला दुपारी यश आले.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ३ वाजताच्या सुमारास लाखी गावातील पिंगळे कुटुंबातील एका मुलीने, तसेच जिल्हाप्रमुख रणजीत ज्ञानेश्वर पाटील व मेघराज पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना संपर्क साधून काही नागरिक पुरात अडकल्याची माहिती दिली. यामध्ये १३ महिला, २ लहान मुले आणि १२ पुरुषांचा समावेश होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून खासदार निंबाळकर यांनी तात्काळ सूत्रे हलवली. पहाटे ४ वाजताच्या सुमारास त्यांनी धाराशिवच्या जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी नाशिक येथील 201 आर्मी एव्हिएशन स्क्वाड्रनचे कर्नल अक्षय कुमार सिंग यांच्याशी चर्चा करून लष्कराच्या हेलिकॉप्टरची मदत मागितली.
सततच्या पाठपुराव्यानंतर, दुपारी १२ वाजता लष्कराचे हेलिकॉप्टर घटनास्थळी दाखल झाले. कमांडिंग ऑफिसर पायलट लेफ्टिनेंट कर्नल करण बरार आणि मेजर देवांश यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अत्यंत कठीण परिस्थितीत अडकलेल्या सर्व २७ नागरिकांना हेलिकॉप्टरद्वारे यशस्वीरित्या बाहेर काढले.

या यशस्वी बचावकार्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रशासनातील सर्व अधिकारी आणि हेलिकॉप्टर सेवा पुरवणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले व त्यांच्या कार्याचे अभिनंदन केले. तसेच, जिल्ह्यात अन्य ठिकाणी असे कोणी नागरिक अडकले असल्यास त्यांनी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या घटनेमुळे खासदार निंबाळकर यांच्या तत्परतेचे आणि प्रशासनाच्या समन्वयाचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!