चुलत बहिणीच्या लग्नात नाचल्याच्या कारणावरून तरुणावर जीवघेणा हल्ला
माझं गांव माझं शहर | परंडा प्रतिनिधी
परंडा तालुक्यातील सरणवाडी येथे चुलत बहिणीच्या लग्नात सर्वांसमोर नाचल्याच्या किरकोळ कारणावरून एका तरुणावर लोखंडी कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक भारत जाधव (वय ३०, रा. सरणवाडी, ता. परंडा, जि. धाराशिव) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, त्यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. १३) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सरणवाडी येथील सूर्यकांत कदम यांच्या घराजवळ दीपक जाधव उभे असताना आरोपी विशाल अर्जुन सावळे, वैभव लक्ष्मण जाधव, गणेश लक्ष्मण जाधव आणि लक्ष्मण धर्मी जाधव (सर्व रा. सरणवाडी) तेथे आले.
यावेळी आरोपींनी “तू तुझ्या चुलत बहिणीच्या लग्नात सगळ्यांसमोर का नाचत होतास?” असा जाब विचारत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर चिडलेल्या आरोपींनी दीपक जाधव यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच सोबत आणलेल्या लोखंडी कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. आरोपींनी जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर दीपक जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात आरोपी विशाल सावळे, वैभव जाधव, गणेश जाधव आणि लक्ष्मण जाधव यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत.
