नीटमुळे ‘ MAHA TET महाटीईटी २०२६’ परीक्षा पुढे ढकलली

माझं गांव माझं शहर,पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) २१ जून रोजी होणार असल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित करण्यात येणारी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२६’ (महाटीईटी) पुढे ढकलण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार आता राज्यात ही परीक्षा २८ जून रोजी घेण्यात येणार आहे.

राज्य परीक्षा परिषदेतर्फे यापूर्वी महाटीईटी परीक्षा २१ जून रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र, एनटीएने नीट परीक्षा याच दिवशी होणार असल्याचे जाहीर केल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली होती. राज्यातील अनेक परीक्षा केंद्रांवर नीट आणि टीईटी या दोन्ही परीक्षांची केंद्रे समान असल्यामुळे परिषदेला वेळापत्रकात बदल करावा लागला.

त्यामुळे आता महाटीईटी परीक्षा २१ जूनऐवजी २८ जून रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेकडून देण्यात आली आहे. काही प्रशासकीय कारणांमुळे वेळापत्रकात आणखी बदल होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

परीक्षार्थ्यांनी अद्ययावत माहितीसाठी परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवावे, असे आवाहन परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.

error: Content is protected !!