माझं गांव माझं शहर | परंडा
परंडा तालुक्यातील मौजे बावची येथे सुरू असलेल्या जलतारा प्रकल्पाच्या कामाची पंचायत समिती परंडाचे गटविकास अधिकारी विजय गायकवाड यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत विस्तार अधिकारी शिंदे साहेब, विस्तार अधिकारी कुठे साहेब, इंजिनिअर पाटील साहेब तसेच ग्रामसेवक सौ. शितल गिरी उपस्थित होत्या.
बावची येथील गट क्रमांक २३ मधील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य कानिफनाथ सरपणे यांच्या शेतामध्ये सुरू असलेल्या जलतारा कामाची पाहणी करताना गटविकास अधिकारी विजय गायकवाड यांनी कामाचे तोंडभरून कौतुक केले. जलतारा खड्ड्यांमुळे भूजल साठ्यात वाढ होऊन भविष्यात विहीर व बोअरवेलसाठी मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी गावातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जलतारा खड्डे करून पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही गायकवाड यांनी ग्रामस्थांना केले.
पाहणी दौऱ्यानंतर सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य कानिफनाथ सरपणे यांच्या हस्ते गटविकास अधिकारी विजय गायकवाड व त्यांच्या पथकातील मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी सरपंच नानासाहेब रोडगे, रोजगार सेवक नितीन रोडगे, शेतकरी हनुमंत सरपणे, अभिमान टोणपे, तेजस सरपणे, दत्ता सरपणे, रामचंद्र क्षीरसागर, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.
चौकट
जलतारा खड्ड्यांमुळे भूजल साठ्यात वाढ
“जलतारा खड्ड्यात पावसाळ्यातील वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरविले जाते. त्यामुळे भूजल साठ्यात वाढ होऊन विहीर व बोअरमधील पाणीसाठा वाढण्यास मदत होते. गावातील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात जलतारा खड्डे खोदून घ्यावेत.”
— कानिफनाथ सरपणे
सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य, बावची
