विधान परिषदेसाठी दत्ताभाऊ कुलकर्णींची ताकद वाढली; तीन जिल्ह्यांतील २५२ सदस्यांचा पाठिंबा असल्याची चर्चा

धाराशिव | प्रतिनिधी,तानाजी घोडके

धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, धाराशिव भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नावाची चर्चा अधिक तीव्र होताना दिसत आहे. विशेष म्हणजे, तीनही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील तब्बल २५२ सदस्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आलेल्या सदस्यांनी दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या उमेदवारीसाठी समर्थन दर्शवत सह्याही केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय समीकरणांकडे आता अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे.

दरम्यान, दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा फॉर्म घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे. पक्षाकडून अद्याप अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी स्थानिक पातळीवरील हालचालींमुळे त्यांच्या नावाची चर्चा जोर धरत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, नगराध्यक्ष आणि इतर स्थानिक प्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे कोणत्या नेत्यामागे किती संख्याबळ उभे आहे, यालाच या निवडणुकीत विशेष महत्त्व दिले जाते.

धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपला प्रभाव वाढवला आहे. त्यासोबतच महायुतीतील विविध गटांमध्ये समन्वय राखण्यात आलेल्या भूमिकेमुळे दत्ताभाऊ कुलकर्णी यांची प्रतिमा संघटनात्मक नेता म्हणून तयार झाल्याचे मानले जाते.

दुसरीकडे, बीड आणि लातूर जिल्ह्यातील काही स्थानिक पदाधिकाऱ्यांकडूनही त्यांच्या नावाबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत धाराशिव जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी काही कार्यकर्त्यांकडून पुढे येत आहे.

विशेष म्हणजे, भाजपचे ज्येष्ठ नेते सुजितसिंह ठाकूर, आमदार राणाजगजितसिंह पाटील तसेच माजी मंत्री बसवराज पाटील यांच्याकडूनही दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नावाला अनुकूलता मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महायुतीतील विविध गटांमध्ये स्वीकारार्ह चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

विधान परिषदेसाठी उमेदवारीबाबत अंतिम निर्णय भाजप पक्षश्रेष्ठींकडून घेतला जाणार असला तरी, सध्या सुरू असलेल्या हालचालींमुळे दत्ताभाऊ कुलकर्णी हे या मतदारसंघातील प्रमुख चर्चेचे केंद्र ठरत आहेत.

error: Content is protected !!