धाराशिव : पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या दरांविरोधात काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी देशपांडे स्टँड येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत इंधन दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. वाढत्या इंधन दरांमुळे महागाई वाढून शेतकरी, महिला, छोटे व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडल्याचा आरोप काँग्रेसने केला. तसेच पेट्रोल-डिझेलचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्याची मागणीही करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
