चिखलातून जीवघेणी पायपीट; देऊळगावातील विद्यार्थ्यांचे हाल- तलाठ्याचे या कामाकडे दुर्लक्ष

घोडके वस्ती–भोसले वस्ती पाणंद रस्त्याचे काम रखडले; ग्रामस्थांत संताप

परंडा, तानाजी घोडके –
परंडा तालुक्यातील देऊळगाव येथील घोडके वस्ती आणि भोसले वस्तीला जोडणाऱ्या पाणंद रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात हा रस्ता चिखलमय बनत असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना आणि नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

सध्या सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला असून अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दररोज मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक वेळा घसरून दुखापती झाल्याच्या घटनाही घडत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

ग्रामस्थांच्या मते, या पाणंद रस्त्याच्या कामासाठी अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. निवडणुकांच्या काळात आश्वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाला गती मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

“रस्त्याचे तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

दरम्यान, शाळकरी मुलांचे होणारे हाल, शेतकऱ्यांच्या वाहतुकीची समस्या आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका पोहोचण्यास येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

या रस्त्याच्या कामासाठी नागरिकांनी तलाठी यांच्याकडे अनेक वेळा प्रश्न उपस्थित केला परंतु या कामाला दुर्लक्षत केले तहसील महसूल प्रशासनाला विनंती आहे तात्काळ या रस्त्याचे काम करून विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी व नागरिकांना वाहतुकीसाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येते

error: Content is protected !!