बोरगाव (करमाळा) येथे शेतकऱ्यांचा संयम सुटला; सबस्टेशनला वेढा, शंभूराजे जगताप यांच्या मध्यस्थीने तणाव निवळला!

माझं गांव माझं शहर | करमाळा प्रतिनिधी

वाढत्या उन्हाळ्याच्या तीव्रतेत आधीच पाणी आणि विजेच्या गंभीर प्रश्नाने होरपळणाऱ्या करमाळा तालुक्यातील बोरगाव येथील शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अखेर अंत झाला. विजेची कपात ८ तासांवरून थेट ६ तासांवर आणण्यात आली असून, त्यातच गेल्या पाच दिवसांपासून गावात वीजपुरवठा खंडित असल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी महिला व लहान मुलांसह पोटेगाव-बोरगाव हद्दीवरील सबस्टेशनला चहूबाजूंनी वेढा घातला. यामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अखेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभूराजे जगताप यांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

पाच दिवसांपासून गाव अंधारात; संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर

बोरगाव हे नदीकाठचे गाव असून, गेल्या वर्षी आलेल्या महापुरामुळे येथील शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातून सावरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, सध्या सुरू असलेल्या तीव्र उन्हाळ्यात महावितरणकडून वारंवार वीज कपात करण्यात येत आहे. ‘मेंटेनन्स’च्या नावाखाली दोन ते तीन दिवस वीजपुरवठा खंडित ठेवण्यात येत असल्याने पिके करपण्याची वेळ आली आहे. या समस्येला कंटाळून अखेर ग्रामस्थांनी सबस्टेशनवर धडक देत आंदोलन छेडले.

अतिरिक्त लोड आणि रखडलेले टेंडर उघड

आंदोलनाची माहिती मिळताच शंभूराजे जगताप यांनी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पदाधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी महावितरणच्या ज्युनियर इंजिनिअरशी थेट चर्चा केली. या चर्चेदरम्यान सबस्टेशनवर अतिरिक्त लोड असल्याने नवीन ‘लिंकिंग लाईन’ मंजूर करण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले. मात्र योग्य पाठपुराव्याअभावी या कामाचे टेंडर रखडल्याची माहिती समोर आली.

यानंतर शंभूराजे जगताप यांनी तात्काळ बार्शी येथील एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर कुराडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत हे काम प्राधान्याने मार्गी लावण्याची मागणी केली.

«“अशा तीव्र उन्हाळ्यात वीज आणि पाण्याअभावी शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे. सर्व गावपुढारी आणि अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावून हा प्रश्न कायमचा सोडवावा.”
— शंभूराजे जगताप, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती»

“काम सुरू झाले नाही तर बार्शी कार्यालयावर मोर्चा”

सुमारे दोन तास चाललेल्या आंदोलनानंतर अधिकाऱ्यांनी तात्पुरता तोडगा काढत गावचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू केला. मात्र, नवीन लिंकिंग लाईनचे काम चालू आठवड्यात सुरू झाले नाही, तर सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन बार्शी येथील एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शंभूराजे जगताप आणि ग्रामस्थांनी दिला आहे.

आंदोलनात यांची होती उपस्थिती

या आंदोलनात सरपंच दीपक भोज, अजित शिंदे, प्रमोद गायकवाड, विनय ननवरे, विशाल शिंदे, अक्षय शिंदे, अक्षय घाडगे, जयसिंग घाडगे, विजय शिंदे, दत्ता म्हस्के, अण्णा म्हस्के, अशोक पाटील, संजय शिंदे यांच्यासह बोरगावमधील शेकडो महिला व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पूराच्या तडाख्यातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या नदीकाठच्या शेतकऱ्यांना आता तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून दिलासा मिळणार का, असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.

error: Content is protected !!