धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी परिसरात धडक कारवाई करत दोन गावठी कट्टे व चोरीची मोटरसायकल जप्त केली असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर दुसरा आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाला.
दि. १८ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणणे, फरार आरोपींचा शोध घेणे तसेच अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी कन्हेरवाडी गावाजवळ गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, प्रशांत उर्फ भमड्या बालाजी काळे (रा. कन्हेरवाडी, ता. कळंब) व अशोक नाना पवार (रा. बावी, ता. वाशी) हे दोघे विना नंबर प्लेटच्या मोटरसायकलवर कन्हेरवाडी पाटी येथे येणार असून त्यांच्याकडे अग्नीशस्त्रे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सापळा रचून दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास संशयित मोटरसायकल थांबवली. पोलिसांना पाहताच एका आरोपीने गावठी शस्त्र टाकून पळ काढला. तर दुसऱ्या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपीने आपले नाव अशोक नाना पवार (रा. बावी शिवार, काटशिवरी पारधी पिढी, ता. वाशी, सध्या रा. कन्हेरवाडी, ता. कळंब) असे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी कट्टा आढळून आला. फरार झालेल्या आरोपीचे नाव विशाल उर्फ प्रकाश उर्फ भामड्या बालाजी काळे असल्याची माहिती त्याने दिली.
चौकशीदरम्यान आरोपीने वापरत असलेली मोटरसायकल मुरुड (जि. लातूर) येथून चोरी केल्याची कबुली दिली. याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात चौकशी केली असता संबंधित मोटरसायकल चोरीप्रकरणी गुन्हा क्रमांक ०४/२०२५, कलम ३०३ अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी दोन्ही गावठी कट्टे आणि चोरीची मोटरसायकल जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार, सपोनि अमोल मोरे, पोह राहुल नाईकवाडी, बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, मपोह शोभा बांगर व चालक पोकॉ दहीहांडे यांच्या पथकाने पार पाडली.

You must be logged in to post a comment.