परंड्यात धक्कादायक प्रकार : सोने खरेदीच्या बहाण्याने महिलेकडून सोन्याचा टॉप्स लंपास

वर्धमान ज्वेलर्समध्ये थरारक घटना

माझं गांव माझं शहर | परंडा

परंडा शहरातील गजबजलेल्या सराफा बाजारात असलेल्या प्रसिद्ध वर्धमान ज्वेलर्समध्ये सोने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या एका महिलेने चक्क सोन्याचा टॉप्स लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली असून परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला दागिने खरेदी करण्याच्या उद्देशाने दुकानात आली होती. विविध दागिने पाहत असताना तिने अत्यंत चलाखीने कानातील सोन्याचा टॉप्स तोंडात लपवून चोरी केल्याचा प्रकार घडला.

दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात महिलेची संशयास्पद हालचाल स्पष्टपणे कैद झाली आहे. दागिने पाहताना तिने अलगदपणे टॉप्स तोंडात लपवल्याचे फुटेजमध्ये दिसून आले. महिलेच्या हालचालींवर संशय आल्याने दुकान मालकांनी तत्काळ दागिन्यांची मोजणी केली असता एक सोन्याचा टॉप्स कमी असल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान, प्रकार लक्षात येताच संबंधित महिला बाहेर उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनात बसून फरार झाल्याची माहिती मिळाली आहे.

या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी महिलेचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे.

“सोने खरेदीच्या नावाखाली चोरीचा प्रयत्न… सीसीटीव्हीमुळे उघड झाला थरार!”

error: Content is protected !!