विकी चव्हाण आणि बालाजी आण्णा घोलप यांच्या पुढाकारातून विविध रस्त्यांची पाहणी
वाशी | माझं गांव माझं शहर – प्रतिनिधी
तेरखेडा जिल्हा परिषद गटात ग्रामीण भागातील शेतरस्त्यांच्या विकासकामांना वेग आला असून विविध महत्त्वाच्या रस्त्यांची पाहणी करून कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. माजी मंत्री तथा परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तेरखेडा जिल्हा परिषद गटाचे सदस्य विकी चव्हाण आणि बालाजी आण्णा घोलप यांनी दिनांक १५ मे रोजी विविध रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी नॅशनल हायवे ५२ तेरखेडा ते वडजी रस्ता, सटवाईवाडी रस्ता ते हेडसरी रस्ता, सटवाईवाडी ते बसवेश्वर मंदिर शिवार रस्ता, माणिकदंड ते सटवाईवाडी रस्ता तसेच खामकरवाडी ते उंबरगा रस्त्याची पाहणी करण्यात आली. तसेच गोळे शिवार, उकरंडे शिवार, घोलप शिवार आणि हलकरे शिवारातील महत्त्वाच्या शेतरस्त्यांच्या कामांचाही आढावा घेण्यात आला.
संबंधित रस्त्यांची कामे लवकर पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
“८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला विचार प्रत्यक्ष विकासकामांतून जपण्याचे काम सुरू असल्याचेही यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर शेतरस्ते करण्यात येतील, असा शब्द आमदार तानाजीराव सावंत यांनी दिला होता. त्यानुसार आता विविध शेतरस्त्यांची कामे प्रत्यक्षात मार्गी लागत असल्याचे चित्र तेरखेडा जिल्हा परिषद गटात पाहायला मिळत आहे.
यावेळी तहसीलदार प्रकाश मेहत्रे, बालाजी हलकरे, कृष्णा माळी, रामलिंग शिंदे, स्वप्निल पोळ, समाधान घोलप, रोहित घोलप यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
