माढा(माझं गांव माझं शहर ) टेंभुर्णी शहरात बुलेट मोटारसायकलींना कर्कश आवाजाचे सायलेन्सर लावून नागरिकांना त्रास देणाऱ्या वाहनचालकांविरोधात टेंभुर्णी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. प्रभारी अधिकारी तथा परी सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल आत्राम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल 37 बुलेट मोटारसायकलींवर कारवाई करण्यात आली असून, 11 बुलेटचे अवैध सायलेन्सर फोडून नष्ट करण्यात आले.
नागरिकांकडून मोठ्या आवाजाच्या सायलेन्सरबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने अकलूज चौक, करमाळा चौक, कुर्डूवाडी चौक तसेच शहरातील विविध रस्त्यांवर नाकाबंदी व पेट्रोलिंग मोहीम राबवली. यावेळी कंपनीमान्य नसलेले सायलेन्सर असलेल्या बुलेट वाहनांची तपासणी करून संबंधित वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत 18 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
याशिवाय काळ्या फिल्म लावलेल्या चारचाकी वाहनांवरही पोलिसांनी कारवाई केली. थार वाहनासह अनेक वाहनांची तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर दंड ठोठावण्यात आला.
दरम्यान, विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातही व्यापक मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये रहदारीस अडथळा निर्माण करणे, मालवाहू वाहनांतून प्रवासी वाहतूक, विनालायसन्स वाहन चालवणे, फॅन्सी नंबर प्लेट, सीट बेल्टचा वापर न करणे, ट्रिपल सीट, विनाहेल्मेट वाहन चालवणे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे आदी प्रकारांवर एकूण 831 केसेस दाखल करण्यात आल्या. या कारवाईतून एकूण 7 लाख 50 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मोहिमेत पोलिस कर्मचारी हनुमंत झिंजे, मगबुल तांबोळी, विशाल शिंदे, रशीद मुलानी, रहमान मुलानी, सोमनाथ गायकवाड, सतीश कापरे, ज्ञानदेव सरडे, संदीप साखरे, दत्तात्रय वाघमारे, प्रसाद अनभुले तसेच होमगार्ड ब्रह्मदेव मुंडे यांनी सहभाग घेतला.
टेंभुर्णी पोलिसांनी नियमबाह्य आणि कर्कश सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनचालकांवर मोठी कारवाई करत ८३१ केसेसमधून ७.५० लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
