माझं गांव माझं शहर : बार्शी, || बार्शी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला असून, सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका तालुक्यातील मोजे खडकलगाव येथील एका गरीब शेतकऱ्याला बसला आहे. शेतात काम करत असताना अचानक अंगावर वीज पडल्याने गणपती पट्टू कोळेकर यांचा बैल जागीच दगावला.
मिळालेल्या माहितीनुसार, बार्शी तालुक्यात दुपारी 4 च्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. खडकलगाव शिवारात शेतकरी गणपती कोळेकर हे आपल्या शेतात नेहमीप्रमाणे कामात व्यस्त होते. यावेळी अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला आणि काळाने घाला घातला. कोळेकर यांच्या बैलावर वीज पडल्याने तो जागीच गतप्राण झाला. सुदैवाने या घटनेत शेतकरी कोळेकर बचावले असले, तरी त्यांच्या संसाराचा मुख्य आधार असलेला बैल गेल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
शेती कामासाठी बैल हा शेतकऱ्याचा उजवा हात मानला जातो. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना, आता ऐन हंगामात बैल दगावल्याने कोळेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. “हजारो रुपये खर्च करून सांभाळलेला बैल अशा प्रकारे गेल्याने आता शेतीची मशागत कशी करायची?” असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
या घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी कोळेकर यांच्या शेताकडे धाव घेतली. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या या नुकसानीचा महसूल विभागाने तातडीने पंचनामा करावा आणि पीडित शेतकरी गणपती कोळेकर यांना शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी खडकलगाव ग्रामस्थांनी केली आहे.
हवामान विभागाने पुढील काही तास वादळी पावसाचा इशारा दिला आहे. विजांचा कडकडाट सुरू असताना शेतकऱ्यांनी झाडाखाली किंवा उघड्यावर थांबू नये, तसेच आपल्या पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
